रस्त्यावर नातेवाईकांचा आक्रोश ; मारेक-यांना ताब्यात देण्याची मागणी
दोन हत्येत सात मारेक-यांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) – कानठळ्या बसविणा-या आवाजात गाणे वाजवित असल्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या भावाची निर्घुण हत्या केली. तर दुस-या घटनेत नातेवाईकाला मारहाण केल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कु-हाडीने वार करण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर हादरुन गेले आहे. या हत्येनंतर नातेवाईकांनी अमळनेरच्या चौकात उतरुन मारेक-यांना आमच्या ताब्यात द्या म्हणत प्रचंड आक्रोश केला.
अक्षय राजू भिल (१८, रा. दाजिबानगर, अमळनेर) आणि नाना मंगलसिंग बारेला (२१, रा. सावखेडा, वैदूवाडा, ता. अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे मारेक-यांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
अमळनेरातील दाजिबानगरात कानठळ्या बसविणा-या आवाजात सोमवारी रात्री आठच्या सुमारास गाणे वाजविले जात होते. अर्जुन नाना सरोदे याच्या गच्चीवर दारुच्या नशेत हा धिंगाणा सुरु होता. त्याचा जाब विचारण्यासाठी दीपक राजू भिल (२१, रा. पाण्याच्या टाकीजवळ, जोशीपुरा, अमळनेर) हा अर्जुनच्या गच्चीवर गेला. तेव्हा राहुल नाना सरोदे, रोहित चेतन सरोदे, कृष्णा चेतन सरोदे आणि अर्जुन पारधी असे चौघेही दारुच्या नशेत नाचत होते. दीपकने त्यांना जोरजोरात गाणे वाजविण्यावरुन जाब विचारला. तेव्हा चौघांनी त्याला शिवीगाळ सुरु केली. या चौघांना दीपक समजावून सांगत असताना राहुल व रोहितने अचानक मारहाणीला सुरुवात केली. दीपकने चौघांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. घरी परतल्यावर त्याने घडलेला प्रकार धाकटा भाऊ अक्षयला सांगितला. त्यानंतर अक्षय लगेचच राहुल आणि रोहितच्या घरी जाब विचारण्यासाठी गेला. त्याच्या मागोमाग दीपक देखील तेथे गेला. तेवढ्यात दीपक व अक्षयची मावशी भुराबाई कालू भिल, मावस बहिण शालू अक्षय भिल या दोघीही गेल्या. अक्षय मारहाणीचा जाब विचारत असताना अर्जुन, कृष्णा सरोदे यांनी त्याला पकडून ठेवले. यावेळी रोहितने त्याच्यावर चाकुने छातीत व पोटात सपासप वार केले. त्याला सोडविण्यासाठी जाताच रोहितची आई निता हिने दीपकच्या डोक्यात बांबू मारला. तर राहुलची आई आरती हिने दीपकच्या पाठीवर लोखंडी रॉड मारला. तसेच राहुलने त्याच्या छातीत चाकुने वार केला. तसेच धाक दाखवत बाजूला घेऊन जात असताना दीपकने राहुलच्या हातातील चाकु हिसकावला. त्यात दीपकच्या बोटाला दुखापत झाली. या भांडणातून दीपकचे मामा अनिल वसंत भिल, नाना वसंत भिल यांनी सगळ्यांची सुटका केली. त्यानंतर दीपक आणि अक्षयला अमळनेरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तर अक्षयची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अक्षयची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी दीपकच्या तक्रारीवरुन रात्री उशिरा सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.
महाराणा प्रताप चौकात कुटुंबियांचा ठिय्या
अक्षयचा धुळ्यातील रुग्णालयात मृत्यू झाल्याची वार्ता अमळनेरमध्ये वा-यासारखी पसरली. त्याच्या हत्येच्या निषेधार्थ तरुण अमळनेरमधील महाराणा प्रताप चौकात लाठ्या-काठ्या, दगड घेऊन जमले. त्यांनी चौकात प्रचंड आक्रोश करत मारेक-यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
मारहाण केल्याच्या रागातून हत्या
नातेवाईक तरुणाला जुन्या कारणातून मारहाण केल्याच्या रागातून त्याने कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील सावखेड येथे सोमवारी मध्यरात्री घडली. नाना मंगलसिंग बारेला याचा डेबूजी सुरसिंग बारेला याच्याशी वाद झाला होता. त्यातून नानाने त्याला मारहाण केली होती. त्या रागातून मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या सुमारास डेबूजी याने नानाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने नानाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चालक दिनेश संतोष पाटील (३८, रा. जुना गाव सावखेडा, ता. अमळनेर) याच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नरसिंह वाघ करत आहेत.