जळगाव ;-
कोरोनाच्या कंटेनमेंट झोन मध्ये असणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज पुण्यतिथी आणि पालखी उत्सवाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर संस्थानने जागेवरच पूजाअर्चा करण्याची परवानगी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडे मागितली होती . मात्र दोन अथवा पाच व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहतील तरच परवानगी देण्यात येईल असे अमळनेर प्रांताधिकाऱ्यानी सांगितल्यानंतरही त्यांचे आदेश धुडकावून पुण्यतिथी पालखी उत्सव शंभरावर लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अमळनेरात २० कोरोनाबाधित आढळल्यानंतरही हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला . विशेष म्हणजे यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असून कुठल्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नाही . त्यामुळे संस्थांनचे पदाधिकारी , संबंधित पोलीस अधिकारी आणि नागरिकांवर गुन्हा दाखल होईल का ? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
एकीकडे देशभरातील धार्मिक स्थळांमध्ये नागरिकांना पूजा अर्चा ,नमाज यासाठी गर्दी करू नये असे आदेश असताना देखील संत सखाराम महाराज पुण्यतिथी आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला .
याबाबत प्रांताधिकारी श्रीमती अहिरे यांना केसरीराजने दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता पाच व्यक्तींशिवाय जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत या अटींवर जागेवरच पूजा करण्यास परवानगी देण्यात आली होती . मात्र संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करीत गर्दी जमवून फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता उत्सव साजरा करण्यात आला . तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यानी परवानगी नाकारल्यानंतरही पोलीस प्रशासनाने परवानगी देत बंदोबस्त ठेवताना भाविकांना नियम का पटवून दिले नाहीत असा प्रश्नही उपस्थित होत असून याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होत आहे.दरम्यान जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी बोलताना दिली.