नाशिक ( वृत्तसंस्था ) – नाशकात एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आपलं लग्न होणार नाही या नैराश्यात व्हॉट्सअपवर आत्महत्येचा स्टेटस ठेवत एका लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला.
अल्पवयीन प्रेमीयुगलाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने या परिसरात खळबळ उडाली आहे देवळा (जि. नाशिक) येथील हॉटेल व्यवस्थापकाविरोधात बेकायदा प्रवेश दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रेमीयुगल देवळा शहरातील रहिवाशी आहेत. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. परंतु दोघेही वयात नसल्याने आपला विवाह होणार नाही असे त्यांना वाटत होते. दोघांनाही नैराश्याने ग्रासले होते. हे पाहता त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देवळा इथल्या वेलकम हॉटेलमध्ये रूम बुक केली.
त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी व्हाट्सअपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेट्स ठेवले. त्यानंतर विषारी औषध प्राशन केले. त्याचवेळी या दोघांच्याही मित्रांनी हे व्हाट्सअपस्टेटस पाहिल्याने तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला.
अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये ओळखपत्र न घेता रूम दिली म्हणून हॉटेल व्यवस्थापक दीपक अहिरे (रा. चिराई, ता. बागलाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून या अल्पवयीन प्रेमीयुगलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक अहिरे भाडेतत्त्वार चालवत असलेले हॉटेल वेलकम देवळा येथील सुनील आहेर यांच्या मालकीचे असल्याचे समजते. मात्र, आहिरेने अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये रूम द्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी कुठलेही ओळखपत्र मागितले जायचे नाही. त्यांच्या नावाची नोंदही रजिस्टरमध्ये ठेवली जायची नाही, असे प्रकार सुरू होते. त्यामुळे अनेक अल्पवयीन जोडपे या हॉटेलमध्ये असे वारंवार येत असतात.