जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
तंजीलाबी शेख अन्सार (वय १७, रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तंजीला आपल्या आई, वडिल व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहीणी आहेत. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या मामाकडे गेली होती.
घरात कोणी नसल्याने तंजीलाने कुठल्यातरी नैराश्याखाली ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ३ वाजता आई, बहीण घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद दिसला. नंतर खिडकीतून डोकाऊन पाहताच त्यांना तंजीलाचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला.
त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तंजीलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.