जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- गटारीत पडलेली चप्पल काढून देण्यास नकार दिल्याने तीन ते चार अल्पवयीन मुलांनी १० वर्षाच्या बालकाच्या मानेवर, पाठीवर व डोक्यात लोखंडी पट्टीने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजीनगरात घडली. यात बालक जखमी झाला असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांत प्रशांत चिंचोरे (वय १० वर्षे, रा. शिवाजीनगर) असे जखमी बालकाचे नाव आहे. छत्रपती शिवाजीनगरातील रिक्षा चालक प्रशांत चिंचोरे यांचा मुलगा वेदांत हा सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घराबाहेर असताना त्याला काही मुलांनी गटारीत पडलेली चप्पल काढण्यास सांगितली. त्यास नकार दिल्याने १४ ते १५ वर्षे वयोगटातील तीन ते चार अल्पवयीन मुलांनी लोखंडी पट्टीने वेदांतच्या मानेवर, पाठीवर व डोक्याच्या मागील बाजूस मारहाण करुन दुखापत केली.
जखमी झालेल्या बालकाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी बालकाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी अज्ञात तीन ते चार मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अश्विनी इंगळे करीत आहेत.