जामनेर तालुक्यात शेंदुर्णीत मुकमोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरुण अबिद हुसेन शेख याने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली असून घटनेचा निषेध म्हणून शेंदूर्णीत नागरिकांनी रविवारी मूक मोर्चा काढला. मोर्चाच्या शेवटी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुकमोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला. या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता. यावेळी बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी घणाघाती भाषणात आरोपी व त्यांच्या साथीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी असे सांगून, ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी महिलांच्या वतीने लिना मनोज चव्हाण यांनी महिला-मुलींना मार्गदर्शन केले.
सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले. आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले. पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे, शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की, आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल.