जळगाव तालुक्यातील घटनेप्रकरणी खळबळ
जळगाव ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीशी बळजबरीने लग्न करून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात ९ संशयित आरोपींविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार घटनेतील संशयित आरोपींना संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती होते. असे असतानाही तिचे लग्न दोन वेळा वेगवेगळ्या दोन जणांसोबत संगनमत करून करण्यात आले. विशेष म्हणजे, या लग्नाला मुलीची आई व भाऊसह इतरही संशयित आरोपी उपस्थित होते. लग्नानंतर दोन जणांनी अल्पवयीन पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर काहींनी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या गंभीर तक्रारीवरून नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय कोळी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.