मध्य प्रदेशातील नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील निमखेडी शिवार परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.
साधारण सहा महिन्यांपूर्वीपासून ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत, संशयित आरोपी मुकेश साकेत (रा. उमरिया, मध्य प्रदेश) याने पीडितेच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नराधम मुकेश साकेत याने केवळ अत्याचार करूनच थांबला नाही, तर ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला ‘जीवे ठार मारण्याची’ धमकी दिली होती. या भीतीपोटी पीडिता काही दिवस गप्प होती. मात्र, अखेर हा प्रकार समोर आल्यानंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१), ६४(२)(m), ६५(१), ३५१(३) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) चे कलम ४, ६ व १२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









