अत्याचार केल्याचे उघड, तीन जणांना अटक
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर परिसरातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर (ता. जामनेर) येथील पोलिसांच्या पथकाने भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भोंदूबाबा सुरेश भगवान भिल (२९, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), रवी धनराज हिवाळे (२५) आणि लह शिवाजी गायकवाड (२०, दोन्ही रा. म्हाडा कालनी, पहूर, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या मुलीचा गुप्त धन काढण्यासाठी उपयोग करण्याचा त्यांचा उद्देश असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ सप्टेंबर रोजी या मुलीचे अपहरण झाले होते. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस पथक सोलापूर येथे रवाना झाले. तिथे गेल्यावर संबंधित आरोपी तेंलगणा राज्यात असल्याचे कळाले. तिथे पंचकुडा नावाच्या गावात पीडित मुलीसह तीन जणांना एका घरातून अटक करण्यात आली. याच गावात त्याने आपल्या मुलीसारख्या असणाऱ्या या बालिकेवर अत्याचार केला. मजुरी करून ते याठिकाणी राहात होते, अशी माहिती मिळाली.
पहूरचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सुस्ते, रवींद्र देशमुख, हेकॉ. दीपक सुरवाडे, पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे विनोद यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पीडित मुलीने महिला दक्षता विभागाला दिलेल्या जबाबावरून विशेष न्यायालयाने अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमानुसार वाढीव कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत.