पाचोरा तालुक्यात पोलिसाकडून पुतणीवर अत्याचार झाल्याची घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – मुंबईत पोलिस असलेल्या मावस काकाने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यावर तिचा गर्भपातही करण्यात आला. यानुसार गुन्हा दाखल झालेला असून आता या प्रकरणात तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला देखील अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयित काकाविरुध्द तसेच तरुणीच्या कुटुंबीयांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुख्य आरोपी अद्याप फरार झाला आहे. तर गर्भपात करणाऱ्या डॉ. रविंद्र पाटील यास अटक केली आहे. तालुक्यातील एका गावात आजी आजोबांसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे पोलिस दलात असलेले प्रविण इंगळे (पुर्ण नाव माहित नाही) या मावस काकाने मे जून २०२५ मध्ये बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास तुला पोलिस होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात त्या मुलीला उलट्या होऊ लागल्या. याबाबत तीने आजीला माहिती दिली. आजीने तिला पाचोरा येथे आणत सोनोग्राफी केली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या आईच्या संमतीने त्या मुलीचा डॉक्टरने गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. दरम्यान, या मुलीनेच जळगाव येथील महिला दक्षता समितीला व्हाट्सअप मेसेज करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. समितीने पाचोरा पोलिसांना ही घटना कळविली.









