जळगाव (प्रतिनिधी) :- अल्कोहोलिक अनॉनिमसचा भाग असलेल्या जळगाव अंतर्गत सर्व समूहाच्यावतीने “मद्यपाश एक जीवघेणा आजार” या विषयावर अल्कोथॉन कार्यक्रम व जनजागृती कार्यक्रम रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे सकाळी ९. ३० ते ५ या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाला जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांचेसह अन्य मान्यवर मार्गदर्शन दोन सत्रात मार्गदर्शन करणार आहे. अल्कोहोलिक ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी ही जगभर पसरलेली संस्था आहे. ही संस्था ज्यांची दारू पिणे ही समस्या बनली आहे व ज्यांना दारू सोडण्याची इच्छा आहे, पण जमत नाही अशा पिडीत व्यक्तीला विनामूल्य मदत करते हे विशेष. या संस्थेद्वारे कुठलीही वर्गणी किंवा फी आकारली जात नाही. या संस्थेमुळे बरे झालेले अनेक सभासद आज आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन सुखी व आनंदाने जगत आहे. मद्यपी नागरिकांनी निर्व्यसनी आयुष्य जगावे यासाठीच जळगाव समूहाचा हा प्रयत्न आहे.
या संस्थेची नियमित सभा दर सोमवार ते रविवार घेतली जाते. तरी सर्व मद्यपिडीत व त्यांच्या कुटुंबीयांनी निशुल्क मदतीसाठी या सभेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी गोपाल सी (९४२०९४२०३९), ऋषी यू (९४२२२२३१७२) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.