माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची प्रतिक्रिया
जळगाव प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला आणि पहाटे ६ वाजल्यापासून जनतेच्या कामाला लागणारा एक जननेता गमावल्याची भावना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे.


“महाराष्ट्र एका धडाडीच्या नेतृत्वाला मुकला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते ‘दादा’ म्हणून सर्वपरिचित होते.
डॉ. उल्हास पाटील यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “अजितदादांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, तेव्हा ते जळगाव जिल्ह्यातील शेती आणि सहकार क्षेत्राबद्दल आत्मीयतेने विचारपूस करायचे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.”









