अहमदनगर येथे जालना एसीबीची कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी) : बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त व लिपिकावर जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. दरम्यान, एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे.
तक्रारदार ४१ वर्षीय इसमाने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह ४ के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि. १८ मार्च रोजी ऑनलाईन अर्ज केला.(केसीएन)सदर परवानगी साठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे (वय ४७) आणि लिपिक टंकलेखक तथा आयुक्तांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे (वय ४८) यांच्यामार्फत ९ लाख ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दि. १९ जून रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे तक्रारी वरून लाच मागणी पडताळणी केली असता लिपिक देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली.(केसीएन)लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे लिपिक देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.