जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक छळ विरोधी कायदा, २०१३” या विषयावर सोमवार दि. १७ रोजी दुपारी उपमुख्य लोकअभिरक्षक ॲड. मंजुळा मुंदडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ.रमेश वासनिक, सहयोगी प्राध्यापक तथा अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ.योगिता बावस्कर, अधिसेविका जयश्री जोगी मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून कार्यक्रमाविषयी डॉ. योगिता बावस्कर यांनी माहीती दिली. त्यानंतर ॲड. मंजुळा मुंदडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लैंगिक छळ विरोधी कायद्यामुळे महिलांना सर्व कामाच्या ठिकाणी, मग ते सार्वजनिक असो वा खाजगी, लैंगिक छळापासून संरक्षण मिळेल याची खात्री होईल. यामुळे लैंगिक समानता, जीवन आणि स्वातंत्र्य आणि सर्वत्र कामाच्या परिस्थितीत समानता या त्यांच्या अधिकारांची प्राप्ती होण्यास हातभार लागेल. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने महिलांचा कामात सहभाग वाढेल, परिणामी त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि समावेशक वाढ होईल, असे ॲड. मुंदडा यांनी सांगितले. संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, अधिपरिचारिका, अधिकारी-कर्मचारी, अंतरवासीता, नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.