सावदा मंडळात चक्का जाम आंदोलन
सावदा प्रतिनिधी – सावदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई न मिळाल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समिती, सावदा मंडळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २३ जानेवारी रोजी चोपडा-अंकलेश्वर महामार्गावर (सावदा-रावेर रोड) ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.

सन २०२४-२५ च्या हंगामात अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे आणि तापमानातील चढ-उतारामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. मात्र, विमा कंपनीकडून अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे.
यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून एका बैठकीत देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्याची सुमारे १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनात सावदा मंडळासह थोरगव्हाण, रणगाव, रायपूर, तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लूमखेडा परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
“आता फक्त आश्वासन नको, थेट पैसे खात्यात हवेत. येत्या काही दिवसांत भरपाई न मिळाल्यास तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आणि सहपरिवार बेमुदत आंदोलन छेडले जाईल.” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.









