जळगावात मध्यरात्री अजिंठा चौकातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. प्रेम ठाकूर हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला होता. टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रेम हा शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेम ठाकूर हा ठार झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.