चोपडा तालुक्यात अडावद येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी):- शेतात काम करत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:३५ वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील अडावद येथे घडली.


रामचंद्र सुरेश महाजन (वय २९, रा. अडावद, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामचंद्र हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांनी तपासणीअंती त्यांना ‘मृत’ घोषित केले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भरत नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तरुण शेतकऱ्याच्या निधनाने अडावद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









