जळगावातील प्रताप नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रताप नगर येथे स्वामी समर्थ केंद्राचे अतिक्रमण महानगरपालिकेकडून शुक्रवारी दि. १८ रोजी काढण्यात आले. त्यानंतर परिसरात असलेल्या ॲड.सुशील अत्रे यांच्या घरावर अज्ञात तरुणांनी दगडफेक करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एका अल्पवयीन मुलासह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या १३ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने जामीनही मंजूर केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत ॲड. पंकज अच्युत अत्रे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरासमोर श्री स्वामी समर्थ केंद्र असून त्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्यामुळे त्यांचे वडील ॲड. अच्युत वामन अत्रे व इतर नागरिकांनी मिळून २००२ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल २०१५ ला लागून व नंतर सुप्रीम कोर्टाकडून अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. (केसीएन)दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वामी समर्थ केंद्रातील अतिक्रमण महानगरपालिकाकडून काढण्याचे काम सुरू असताना रात्री १० वाजता सुमारास ॲड. पंकज अत्रे यांच्या घरासमोर अज्ञात १२ ते १५ जण आले.
त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे व त्यांच्यासोबत इसमांनी जोरजोरात आरडाओरडा करून व शिवीगाळ करून घरावर दगडफेक केली. त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करून घराचे समोरील लोखंडी गेट जबरदस्ती लोटून अनधिकृत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.(केसीएन) घरातील सदस्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कोणाला मानत नाही. आत्ताच यावर स्टे आणा नाहीतर तुम्हाला सर्वांना मारून टाकू अशी धमकी दगडफेक करणार्यांनी दिली व कोर्टाचा अवमान केला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, अशी फिर्याद दाखल केली आहे
यानुसार मनसेचे शहर उपाध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे (वय ४६, रा. श्रीराम कॉलेज, जळगाव), साजन सतीश पाटील (वय ३०, रा. जुना असोदा रोड, जळगाव), कमलेश मंगेश डांबरे (वय ४२, रा. गणेशवाडी, जळगाव), निक्की परमेश्वर सैनी (वय १८,रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), मिहीर अशोक विभांडीक (वय २१, रा. शिव कॉलनी, जळगाव), हरिओम लीलाधर सूर्यवंशी (वय २२, रा. आशाबाबा नगर, जळगाव), राजेंद्र सुकलाल मिस्त्री (वय ३८, रा. रायसोनी नगर, जळगाव), खुशाल शिवाजी ठाकूर (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव), दीपक जोरसिंग राठोड (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव), निलेश पितांबर परदेशी (वय ३१, रा. रामानंदनगर, जळगाव),(केसीएन)आशुतोष किशोर जाधव (वय २५, रा. न्यू बी.जे. मार्केट, जळगाव), ज्ञानेश्वर धनराज बाविस्कर (वय २५, रा. तरसोद ता. जळगाव) यांच्यासह १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी काहींना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.