जामनेर तालुक्यात गंगापुरी रस्त्यावरील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : भुसावळहून जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. ही घटना शनिवारी दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिक्सर ट्रक (क्र. एमएच १९-सीएक्स-२१८१) या गाडीने पियाजो रिक्षा (क्रमांक एमएच-१९-व्ही-३७०४) ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण ८ प्रवासी बसलेले होते. तेव्हा ही घटना घडली. मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रूक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये जयेश निंबाळकर (१६), सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९, राहणार चिंचखेडा), योगेश विठ्ठल गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेश कापडे (५०), संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यापैकी सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९, राहणार चिंचखेडा) यांचा जळगावसाठी उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला. मागील महिन्यातच जामनेर पहूर दरम्यान मोटरसायकल व पिकअप गाडीचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला होता. निकिता निंबाळकर हिचे येत्या २३ जानेवारी रोजी लग्न ठरले होते. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच जामनेरनजीक अपघातात तिचा मृत्यू झाला.









