जळगाव बायपास, आव्हाणे शिवारात रविवारी संध्याकाळी थरार
जळगाव (प्रतिनिधी) : बायपासवर धावत्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. हे चारचाकी वाहन दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका ट्रेलरच्या डिझेल टँकवर धडकले, ज्यामुळे वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. हा अपघात रविवारी दि. ५ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारात बायपासवर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तरसोद फाट्याकडून पाळधीकडे जाणारे चारचाकी वाहन (क्र. एमएच १९, ईजी १८७८) भरधाव वेगात असताना अचानक त्याचे टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते वाहन दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या एका ट्रेलरच्या (क्र. सीजे ०७, बीआर ३७१७) डिझेल टँकवर जोराने धडकले. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी) आणि पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरुण) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
उपचारांसाठी दाखल अपघातात जखमी झालेल्या दोघांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर तरुणाच्या पायालाही मार लागला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.








