जळगावात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – भटक्या कुत्र्यांच्या अंगावर ॲसिड सदृष्य पदार्थ टाकून त्यांना जखमी केले जात असल्याचा प्रकार जुने जळगाव परिसरात केला जात आहे. यामुळे आठ ते नऊ कुत्र्यांच्या अंगावर जबर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात शुक्रवार, १५ मार्च रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल पेठेतील रहिवासी मंगेश वर्मा यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्मा यांचे दुकानाजवळ येणाऱ्या भटक्या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याच्या अंगावर ९ मार्च रोजी जखम दिसली. कोणत्यातरी कुत्र्याने चावा घेतला असावा, म्हणून त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. नंतर मात्र १२ मार्च रोजी ही जखम वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी इतरही कुत्र्यांच्या अंगावर जागोजागी खोल जखमा झाल्याचे दिसले. त्या वेळी लक्षात आले की, कोणीतरी खोडसाळपणाने या कुत्र्यांच्या अंगावर ॲसिड सदृष्य पदार्थ टाकला असावा. त्यांनी पशुपापा फाउंडेशन, वन्यजीव संरक्षण संस्था यांना कळवून या कुत्र्यांवर उपचार सुरू केले आहे. तसेच या विषयी वर्मा यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील करीत आहेत.