जळगावात महामार्गावरील इच्छादेवी चौकात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : इच्छादेवी पोलिस चौकीजवळ मंगळवारी वाहनात गॅस भरताना झालेल्या स्फोटातील गंभीर जखमी गॅस सेंटर चालक दानिश शेख (वय ४६) यांचा मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
स्फोटात जखमी झाल्यानंतर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दानिश यांची प्रकृती गंभीर असल्याने तसेच ते स्फोटात ६० टक्केपेक्षा अधिक भाजले गेले असल्याने पुढील उपचारासाठी बुधवारी रात्री मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र गुरुवारी उपचार सुरू असताना दानिश यांचा मृत्यू झाला. दानिश हे मूळचे भुसावळ येथील रहिवासी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. शुक्रवारी त्यांचा मृतदेह जळगावकडे रवाना होईल असे त्यांच्या नातलगांकडून सांगण्यात आले.
इच्छादेवी पोलीस चौकीजवळ बुधवारी व्हॅनमध्ये अवैधरित्या गॅस भरताना हंडीचा भीषण स्फोट झाला होता. त्यात तीन महिलांसह दहा जण भाजले गेल्याची घटना घडली होती. यात दोन कुटुंबातील सात व्यक्तींचा समावेश होता. पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातून पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
तर जळगावातील दालवाले कुटुंबातील महिला व स्फोटातील जखमी पुरूष व त्यांची दोन मुले यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी हलवण्यात आले. या चारही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. हे रुग्ण ५० टक्क्याहून अधिक भाजले असून यात चेहऱ्याला इजा झाली आहे. जखमी व्हॅन चालकावर जीएमसीत उपचार सुरु आहे.