जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ममुराबाद रस्त्यावर महाविद्यालयामध्ये जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण विद्यार्थी जागी ठार झाला आहे तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.
फैजल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील यांच्यासह मास्टर कॉलनी येथे राहत होता. फैजलच्या वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. (केसीएन)तर फैजल पटेल अरुणाबाई फार्मसी महाविद्यालय येथे तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. दरम्यान शनिवार दि.१ मार्च रोजी फैजल पटेल हा त्याचा वर्गातील मित्र वासिक खान युसुफ खान (वय २०) याच्यासोबत ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयामध्ये जात असताना ममुराबाद रोडवर बायपास रस्त्यावर अज्ञात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासिक खान हे गंभीर जखमी झाले.
त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याच्या मित्रांनी दाखल केले असता त्या ठिकाणी फेजलखान याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर वासिक खान याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महाविद्यालयिन तरुणाच्या मृत्यूमुळे मास्टर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.