जळगाव तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून शिरपूर येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा जळगाव येथे आल्यावर म्हसावद येथे घरी जात असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने झालेल्या भीषण अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
नितीन भाऊलाल वानखेडे (वय ४०, रा. म्हसावद ता. जळगाव) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते म्हसावद येथे आई-वडील, पत्नी, चार मुले यांच्यासह राहत होते. अनेक वर्षांपासून शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून ते सेवा बजावत होते.(केसीएन)अनेक वर्ष शिरपूर येथे सेवा बजावल्यानंतर आता जळगावला बदली करून घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यासाठी शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ते प्रशासकीय काम झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता म्हसावद येथे घरी दुचाकीने परतत होते. अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्यांचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला.
या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान कुटुंबीयांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ४ दिवसानंतर मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान आरोग्यसेवकाच्या मृत्यूमुळे म्हसावद गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य क्षेत्रात दुःखाची किनार पसरली आहे.