जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहराजवळील निमखेडी शिवारात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास तीन ते चार वाजता एका भीषण अपघातात अवजड वाहनाच्या धडकेत रिक्षातील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शिंदे गटाच्या महिला महानगर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती व दीर या अपघातात ठार झाले आहेत.
ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी मयत इसमाची नावे आहेत.निमखेडी येथील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही बंधू गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.(केसीएन)मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात दोघं सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.(केसीएन)अपघातानंतर मयतांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धडक देणाऱ्या वाहनाचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.