जळगाव शहरातील मानराज पार्क जवळची घटना ; चालकाला नशिराबाद येथे घेतले ताब्यात, घटना सीसीटीव्हीत कैद
जळगाव (प्रतिनिधी) : वाटिकाश्रमजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहराकडे दुचाकीने बाजारात जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह १७ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.दरम्यान, धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ पकडले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) आणि दिक्षिता राहूल पाटील (वय २७ दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत दोघांची नावे आहेत. द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह राहत होती. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या. (केसीएन) तसेच या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील या तीन वर्षाच्या मुलगा रूद्रा आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दुचाकीने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.
खोटे नगरकडून जळगाव शहराकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले. या अपघातात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.(केसीएन) या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, घटनास्थळी माजी महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शासकीय रुग्णालयात आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी घटनेची माहिती आ. भोळे यांनी जाणून घेतली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते.