जळगावच्या पिंप्राळा परिसरावर शोककळा
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा-जळगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात जळगाव शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य पाच तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे जळगावच्या पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली आहे.


घटनेत श्रीरंग सुरेश पाटील (रा. पिंप्राळा, जळगाव), प्रसन्न रवींद्र निमजे (रा. पिंप्राळा, जळगाव) हे मयत झाले आहेत. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण एका खाजगी कार्यक्रमासाठी पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे इनोव्हा कारने गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्व मित्र रात्री जळगावच्या दिशेने परत येत होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाचोरा-जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ कार आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात धडकली.
धडक इतकी भीषण होती की कारने दोन ते तीन वेळा पलटी घेतली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेमुळे रस्त्याच्या कडेला असलेला महावितरणचा विजेचा खांबही कोलमडून पडला. वाहनात बसलेल्या श्रीरंग पाटील आणि प्रसन्न निमजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

वाहनातील इतर पाच जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना सुरुवातीला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.










