पायलट शाम्भवी, सुमित कपूरही “स्ट्रगल” मधून आलेत पुढे
जळगाव (डेस्क रिपोर्टर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती तालुक्यात विमान अपघातात निधन झाले. या अपघातात यांचेसह एकूण ५ जण उपस्थित होते. या पाचही जणांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.


पिंकी माळी
ठाण्यातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी (२९) यांचाही मृत्यू झाला आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पिंकीची स्वप्न या दुर्घटनेत जळून खाक झाली. वरळीत म्हणजेच तिच्या माहेरी तिचे आई – बाबा, भाऊ राहतात. कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती अधूनमधून वरळीत येत असे. तसेच, नित्याने आई – बाबांशी फोनवर बोलून त्याची विचारपूस करत असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री तिने बाबांना फोन केला. ‘उद्या सकाळी अजितदादांसोबत बारामतीला जाणार आहे. त्यांनतर मी वैयक्तिक कामासाठी पुढे नांदेडला जाईन. तिथे हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला फोन करते’, हा तिचा वडिलांसोबतचा शेवटचा संवाद. लेकीच्या अकाली जाण्याने तिच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. आई – बाबांना आधार देण्यासाठी त्यांची मोठी लेक, कोकिलाबेन रुग्णालयातील परिचारिका माहेरी आली आहे.
शाम्भवी पाठक
दुर्दैवाने अपघाताचा बळी ठरलेल्या लिअरजेट ४५ च्या पायलट-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांनी ‘वायु सेना बाल भारती स्कूल, ग्वाल्हेर’ येथून आपले शिक्षण पूर्ण केले होते. येथूनच त्यांचे हवेत उडण्याचे स्वप्न सुरू झाले. २०१८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शांभवी यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. येथून त्यांनी एरोनॉटिक्स/एव्हिएशन/एरोस्पेस विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात बी.एससी. पदवी संपादन केली आणि त्यानंतर ‘न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमी’मध्ये प्रवेश घेतला. न्यूझीलंड देशातील इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमध्ये त्यांनी कठोर व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. २०१८ ते २०१९ दरम्यान, त्यांनी न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी आणि भारताचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या दोघांच्या मानकांनुसार आपले कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त केले.
शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून वैमानिकी, विमानन आणि अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान विषयात पदवी पूर्ण करून आपली पात्रता अधिक वाढवली, जी त्यांनी २०२२ मध्ये पूर्ण केली. स्वतः पायलट बनण्यासोबतच, शांभवी भावी पिढीच्या वैमानिकांना प्रशिक्षित करण्यासाठी समर्पित होत्या. त्यांनी ‘मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब’मध्ये सहाय्यक उड्डाण प्रशिक्षक म्हणून काम केले आणि त्यांच्याकडे ‘फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंग (A)’ देखील होते. शांभवी यांना वरुण नावाचा एक लहान भाऊ आहे. त्यांच्या आईचे नाव रोली शुक्ला पाठक आहे. शांभवी यांचे आजोळ उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आहे. मात्र, सध्या त्यांचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी, शांभवी या पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर यांच्यासोबत दोन सदस्यीय कॉकपिट क्रूचा भाग होत्या. दिल्लीस्थित चार्टर फर्म ‘VSR’ द्वारे संचलित हे विमान अजित पवार, त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदित जाधव आणि सहाय्यक पिंकी माळी यांना विविध राजकीय कार्यक्रमांसाठी घेऊन जात होते. सकाळी सुमारे ८:४५ वाजता, जेव्हा विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड झाला, विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याला आग लागली.
विदीप जाधव
विदीप जाधव हे २००९ च्या बॅचचे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल होते आणि ते अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी ते ओळखले जात होते. या दुर्दैवी अपघाताच्या वेळी ते आपल्या कर्तव्यावर तैनात होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सहकारी आणि नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांचे वर्णन ‘नेहमी कर्तव्याला प्राधान्य देणारा एक समर्पित अधिकारी’ असे केले आहे.
सुमित कपूर कोण होते?
कॅप्टन सुमित कपूर यांनी या दुर्दैवी विमानाचे पायलट-इन-कमांड म्हणून काम केले. वरिष्ठ पायलट म्हणून त्यांनी उड्डाण कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले आणि उड्डाण, लँडिंग यांसारख्या गंभीर टप्प्यांवर निर्णय घेतले. कॅप्टन सुमित कपूर या उड्डाणाचे मुख्य प्रभारी होते. विमानातील सर्वात वरिष्ठ क्रू सदस्य म्हणून, विमानाची दिशा ठरवणे, लँडिंग आणि आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय अशा सर्व महत्त्वाच्या तांत्रिक बाबींची जबाबदारी त्यांच्यावर होती.









