जळगावजवळच्या पाळधी बायपास जवळची घटना
जळगाव प्रतिनिधी – जळगाव-पाळधी दरम्यान असलेल्या रिंगणगाव-सावदा बायपास रस्त्यावर दुचाकी आणि ट्रॉलाच्या भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या ६ वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता घडली आहे. या घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एरंडोल तालुक्यातील निपाणी येथील रहिवासी देशमुख चुनीलाल राठोड (वय ५५) यांनी नुकतीच जळगाव येथून एक नवीन कार घेतली होती. या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी आणि काही चौकशीसाठी ते पत्नी बेबीबाई राठोड (वय ५०) आणि नातू परेश दिनेश राठोड (वय ६) यांच्यासह दुचाकीने (क्रमांक एमएच १९ इ आर १६४२) जळगाव येथील हुंडाई शोरूममध्ये आले होते.
जळगाव येथील काम आटोपून तिघेही पुन्हा आपल्या गावाकडे दुचाकीने परतत असताना, पाळधी गावाजवळील रिंगणगाव-सावदा बायपास रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलाने (क्रमांक एमएच ०५ ए एम ३२४८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे तपासणीअंती देशमुख राठोड आणि नातू परेश राठोड यांना मृत घोषित करण्यात आले. बेबीबाई राठोड यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने रुग्णालय परिसर हेलावून गेला होता. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. चालक आणि वाहन दोन्ही सध्या पाळधी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मृत देशमुख राठोड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.









