जळगाव तालुक्यातील घार्डी रस्त्यावरील घटना, चोपडा तालुक्यात शोककळा
जळगाव प्रतिनिधी : वडिलांवर उपचार करण्यासाठी त्यांना दुचाकीवरून जळगावात घेऊन येणाऱ्या पिता-पुत्राला अज्ञात ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. घार्डी फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात मोहम्मद लुकमान ठोके (३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (७५) या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे लासूर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी असलेले लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांची प्रकृती बरी नसल्याने, त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान (वय ३९) हा त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जळगावकडे घेऊन येत होता. दोघेही दुचाकीने लासूरवरून जळगावकडे येत असताना, सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या एका अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही ‘मयत’ घोषित केले. मोहम्मद लुकमान हे भंगार विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मोहम्मद लुकमान यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शासकीय रुग्णालयात जळगावचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी नातेवाईकांना धीर दिला. घटनेमुळे चोपडा तालुक्यातील लासुर येथे शोककळा पसरली आहे.









