जळगाव शहरातील एसपी कार्यालयाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५४, रा. खोटेनगर, जळगाव) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला. वानखेडे यांच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे हे गुरुवारी दि. २६ डिसेंबर रोजी दुपारी शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात कॅफोसह गेले होते. जेवणाचा डबा नसल्याने महाराष्ट्र बँकेलगत ते पराठे घेण्यासाठी आले. त्यांनी पोलिस निवासस्थानाजवळ वाहन लावून ते पायी रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात ते हवेत फेकले जावून खाली पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
वानखेडे यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर कोरोना काळात त्यांच्या आई वडीलांचे देखील निधन झाल्याने वानखेडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखातून सावरत नाही तोच वानखेडे यांच्यावर महिनाभरापुर्वी हृदयासंबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता त्यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून दुःखाचे सावट असलेल्या वानखेडे कुटुंबामध्ये आनंदाचा क्षण आला होता. दिलीप वानखेडे यांचा मुलगा मानस हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तर्णी झाला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याची मुलाखत असल्याने तो त्याची तयारी करीत होता. मुलाने केंद्रीय आयोगाची परिक्षा पास झाल्यामुळे वानखेडे कुटुंबिय अत्यंत आनंदीत होते. मात्र त्यांच्या आनंदावर दुर्देवी काळाने झडप घातली.
अपघातात मयत झालेले दिलीप वानखेडे यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असून दोन्हीही अविवाहीत आहे. गेल्या काही वर्षापुर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या पित्याचा देखील दुर्देवी मृत्यू झाल्याने त्या बहिण भावाच्या डोक्यावरील आई पाठोपाठ पितृछत्र देखील हरपले. त्यामुळे दोन्ही मुले पोरके झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.