अमळनेर नगरपरिषदेत लाचेची मागणी करणाऱ्या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही
जळगाव प्रतिनिधी अमळनेर शहरातील नगरपालिकेत काम करणाऱ्या एका शिपायाने तेथीलच एका कर्मचाऱ्याला आश्वासित प्रगती योजनेमध्ये सहकार्य करण्यासाठी २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यवाही करत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार हे नगरपरिषद अमळनेर येथे कार्यरत असून त्यांना १०,२०,३० प्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा दुसऱ्या हफ्त्याचा लाभ मंजूर झाला नव्हता. त्यासाठी ते नगरपरिषद, अमळनेर कार्यालयातील शिपाई (आस्थापना व प्रशासन) मनोज निकुंभ यांना भेटून त्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चिती मंजूर करण्यासाठी काय प्रक्रिया असते याबाबत विचारपूस केली. त्यांनी आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चितीचा दुसरा हप्त्याची मुख्याधिकारी यांच्याकडून मंजूर करून आणून देण्यासाठी २ हजार रुपयाची लाच रक्कम मागणी केली.
म्हणून तक्रारदार यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी शिपाई यांचे विरुद्ध ला. प्र. वि. जळगाव यांच्याकडे लाच मागणी केल्याची तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २२ ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता शिपाई मनोज निकुंभ यांनी तक्रारदार यांचे १०,२०,३० ची आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चिती फरकाची रक्कम मंजूर करून आणून देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक निकुंभ यांनी २ हजारची लाचेची मागणी केली.
तक्रारदार हे शिपाई निकुंभ यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी गेले असता निकुंभ यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रक्कम स्वीकारली नाही. करीता शिपाई मनोज निकुंभ यांच्याविरूध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक स्मिता नवघरे यांनी फिर्याद दिली आहे.
पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, पोना/बाळु मराठे, पोकों/प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई केली.









