लाचखोर सरकारी वकिलास नाशिकच्या पथकाकडून अटक

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ न्यायालयातील सरकारी वकिल राजेश गवई यांनी जामीनाला विरोध करण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून मागितली होती. या संशयित लाचखोर वकिलाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. राजेश साहेबराव गवई यांनी जळगाव जिल्हा न्यायालयातही यापूर्वी काम केले असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन येथील दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये संशयीत आरोपी याला जामीनास विरोध करावा म्हणून सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजाराची लाच वकिल राजेश गवई यांनी मागितली होती. जळगाव येथील तापी पाटबंधारे कार्यालयासमोरील रस्त्यावर लाच देण्यासाठी तक्रारदार यास राजेश गवई यांनी बोलावले होते. याठिकाणीच सापळा रचून राजेश गवई याला अटक करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून नाशिक लाचलुचपथ प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, सहअधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही पाटील यांच्यासह सापळा पथकामध्ये पो.ना. प्रकाश महाजन होते. या पथकाने पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. दरम्यान राजेश गवई यांच्या कारवाईमुळे सरकारी वकिलसुद्धा लाच घेऊन संशयीतांना प्रत्यक्ष मदत करत असतील तर न्यायदानाच्या प्रक्रियेवरील विश्वासाल कुठेतरी तळा जात असल्याचे बोलले जात आहे. लाचखोर वृत्तीविरूध्द आवाज उठविण्यासाठी तक्रार करण्याचे लाचलुचपथ पथकाने आवाहन केले आहे.







