जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना राजकीय वैमनस्यातून एका महिलेकडे हनी ट्रॅपमध्ये फसविण्यासाठी सुपारी दिल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आल्याची माहिती पद्मालय रेस्ट हाऊस येथे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत अँड. कुणाल पवार व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे मागील काही दिवसांपासून विविध आंदोलनामुळे जळगाव शहरात चांगलीच चर्चेत आले आहेत. परंतु याच दरम्यान त्यांना बदनाम करण्यासाठी एका महिलेला 50 हजार रुपयात आणि हनी ट्रॅपची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत अभिषेक पाटील यांनी स्वतः रामानंद नगर पोलिस स्थानकात तक्रार दिली.