जो मनाची भूक छेदतो तो भाव रुपाने भिक्षू असतो. भिक्षू दोन प्रकारचे असतात द्रव्य भिक्षु आणि भाव भिक्षु. आपण मनाच्या रुपाने विचार करून मनात निर्माण होणारे भाव म्हणजे लोभ याचा विचार करू या. माणूस वृद्ध होतो पण तृष्णा किंवा लोभ वृद्ध होत नाही, आयुष्य घटते पण लोभ नाही घटत नाही. तृष्णा किंवा लोभ सर्व पापांचे मूळ, कषायाचे स्थान मानले जाते. पुद्गलांवर असलेली प्रिती आणि लोभ यामुळे आत्मा पतन होऊन अधोगतीकडे प्रवास होतो. आपल्यातून लोभ गेला आणि संतोष आला तर कदाचित आपली दुर्गती होणार नाही असे विचार प.पू. सुमित मुनिजी म.सा. यांनी व्यक्त केले.
लोभ असला की भौतिक जगतात देखील आपण सहज फसतो, फसविले जाते आपल्याला मूर्ख बनविले जाते. अमूक ठिकाणाहून तुमचे पार्सल आले आहे ते सोडवण्यासाठी इतके पैसे भरा असे किंवा ऑनलाईन फसगत ही आपल्यात असलेल्या लोभामुळेच होते. त्यासाठी एक गोष्ट सांगितली. एका गावात खूप सारी गाढवं होती. एक मालक व सेल्समन त्या गावात येऊन एक हजार रुपयाला गाढव अशी योजना गावकऱ्यांसमोर मांडली जाते. गावातील दोघे चौघ आपली गाढवं घेऊन गेले असता त्यांना त्याबद्दल पैसे मिळतात. गावात जोरदार चर्चा होते. गावातील गाढवं कमी होत गेल्यावर गाढवांची किंमत वाढवून मिळते. गाढव द्या पंधरा हजार रुपये न्या. अशी योजना असते परंतु कुणाकडेही गाढवं म्हणतात. सेल्समनने त्यांना विश्वासाने सांगितले की चिंता करू नका तुम्ही आज दहा हजार रुपये जमा करून गाढव घेऊन जा. उद्या तुम्हाला प्रती गाढव पंधरा हजार रुपये मिळतील. गावकऱ्यांच्या लोभामुळे ते दोन पायांचे गाढव ठरले. लोभ-तृष्णा कमी करून खऱ्या अर्थाने आपल्या लोभ, इच्छांचे छेदन करून भाव रुपाने भिक्षू बनले पाहिजे असे आवाहन करण्यात आले. चातुर्मास अंतिम टप्प्यात असल्यामुळे या प्रवचनाआधी श्रावक-श्राविकांनी चातुर्मास बद्दल आपली अनुभव व विचार व्यक्त केले.