अमळनेर तालुक्यात हेडावे रस्त्यावर घटना, एकरूखी गावात शोककळा
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यात हेडावे रस्त्यावर भरधाव आयशर वाहन व दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकरुखी येथील दाम्पत्य जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवार दिनांक २५ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेडावे रस्त्यावर गुरुवार दिनांक २५ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास २ दुचाकी आणि आयशर अशा तिहेरी अपघातमध्ये एकरूखी येथील विश्वनाथ हिंमत भील (वय ३०) व ज्योती विश्वनाथ भील (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल चालक बाळू साहेबराव पाटील (वय ५०) हा जबर जखमी झाला.
अपघातानंतर अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथकाने धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी आणि मृतांचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघातात मयत झालेला विश्वनाथ भिल हा एकुलता एक असून अपघातात त्याची पत्नीही मरण पावल्याने एकरूखी गावात शोककळा पसरली आहे. विश्वनाथचे आईवडील वयोवृद्ध असून त्याच्या पश्चात ९ व ७ वर्षाचा मुलगा आहे. कमावता एकुलता एक मुलगा गेल्याने तसेच चिमुकल्याचे मातृ-पित्रृ छत्र हरपल्याने कुटूंब उघड्यावर आले आहे.