जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी मिळाली. नंतर तीन महिन्यातच लग्नानिमित्त घरी आल्यावर हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि त्यातच शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्याने ते २० वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अविनाश अनिल दोरकर (जोशी, वय २३ रा. जोशी कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अनिल गणपत दोरकर (जोशी) यांचा अविनाश हा एकुलता एक मुलगा. जळगावातच अविनाशने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व तीन महिन्यांपूर्वीच पुणे येथे नोकरीला लागला होता. गेल्या आठवड्यात तो एका नातेवाईकाच्या लग्नासाठी जळगावात आला. त्यानंतर रात्री त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेले.
तेथे रक्तवाहिनांमध्ये ४० टक्के ब्लॉकेज आढळून आल्याने सोमवारी स्टेंट टाकण्यात आला. बुधवारी त्याला रुग्णालयात सुटी देण्यात आली. शुक्रवारी पहाटे पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागले व त्यातच त्याचे निधन झाले. २९ नोव्हेंबर रोजीच त्याच्या चुलत भावाचे लग्न झाले आहे. एवढ्या कमी वयात अविनाशच्या अचानक जाण्याने शोककळा पसरली आहे. अनेक लग्न समारंभांमध्ये त्याने अँकरिंग व मिमीक्री सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा गेल्याने समस्त वासुदेव जोशी समाज सेवा संघ जळगाव, पंचमंडळी, समाजबांधवांच्यावतीने शोक व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे पदाधिकारी रविंद्र जोशी यांचा तो पुतण्या होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, काका, काकू असा परिवार आहे.