यावल तालुक्यातील अकलूद येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकलूद गावातील ६५ वर्षीय प्रौढाने तापी नदीच्या पुलाखाली नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येस कारणीभूत म्हणून दाखल गुन्ह्यामध्ये २ संशयित आरोपींना फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
प्रभाकर कडू पाटील (वय ६५ वर्ष, रा. अकलूद ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी दि. १२ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या पूर्वी अकलूद गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल होता.(केसीएन)दरम्यान मयत प्रभाकर पाटील यांचे बंधू हिरामण कडू पाटील (वय ६०, रा. तापी नगर, भुसावळ) यांनी शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी फैजपुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.
संशयित आरोपी विनोद श्रीराम इंगळे आणि गणेश भागवत काळे (दोन्ही रा. अकलूद ता. यावल) यांनी उसनवारीच्या पैशाचे व्याज मागणीसाठी वारंवार मयत प्रभाकर पाटील यांच्याकडे तगादा लावला होता. या तगादा लावल्यामुळे प्रभाकर पाटील यांची मनस्थिती खराब झाल्याने त्यांनी तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली,अशी फिर्याद प्रभाकर पाटील यांचे बंधू हिरामण पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल झाला असून दोघेही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीरज बोकील हे तपास करीत आहेत.