जे योग्य बरोबर आहे त्याला मानायचे नाही, जे नाही आहे त्याला मात्र मानायचे हे झाले मिथ्यत्व. सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला मिथ्यत्व सोडून ज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल. आम्ही बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देत असतो परंतु आंतरात्मा देखील खूप मोलाचा आहे. आत्म्याच्या कल्याणासाठी हा मानव जन्म मिळालेला आहे त्याला व्यर्थ घालवू नये असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले.
आजचा विषय स्पष्ट करताना उत्तराध्यायन सुत्राच्या ६ व्या अध्यायाची गाथा विचारात घेतली. अविद्या वा अज्ञानी व्यक्ती यांना सर्व दुःख प्राप्त होतात. कल्पवृक्षाच्या खाली बसलेले असून देखील हात रिकामे असे काहींचे होत असते. ज्ञान न प्राप्त होण्याचे पाच कारण सांगितले गेले. ज्ञान असणे कसे उत्तम ठरते यावर प्रकाश झोत टाकला गेला. ज्ञानाचे फळ म्हणजे पापांची निवृत्ती! काही वेळा शाळेत जाणाऱ्या त्या मुलाप्रमाणे आपलाही गोंधळ होतो. शाळेत खोटे बोलू नये, कुणाचा तिरस्कार करू नये, कुणाशी भांडण करू नये या गोष्टी सांगण्यात आलेल्या असतात. परंतु वास्तविक जीवनात याच्या विरुद्ध वागले जाते. मी बाहेर आहे असे मुलासमोर वडील खोटे बोलतात, आई व आजी भांडण करतात, काही मागायला आलेल्या भिकाऱ्याचा तिरस्कार केला जातो. शिकवले जाते त्यापेक्षा वास्तव वेगळेच असते. त्यामुळे वैचारिक गोंधळ उडतो. आपण सर्व भवी जीव आहोत त्यामुळे आत्म्याच्या कल्याणासाठी ज्ञानाचा चांगला उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले. सकाळी वृत्तपत्रात ९० टक्के नकारात्मक बातम्या वाचत बसण्यापेक्षा सकारात्मक धार्मिक बाबींचे वाचन करावे. नकारात्मकतेमुळे आपला काहीही फायदा होणार नाही हे ध्यानात घेऊन जसे पाण्याच्या प्युरिफिकेशनचा विचार करत असतो तसाच वाणी व विचारांच्या प्युरिफिकेशनच्या बाबत कृतीशील असावे असे आवाहन परमपुज्य ऋजुप्रज्ञजी महाराज यांनी केले.