बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेलवड गावी एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली असून मयात शेतकऱ्याचे नाव संजय सीताराम सोनवणे (वय ४७) असे आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेलवड येथील संजय सीताराम सोनवणे यांनी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास स्वतःच्या कपाशीचे व मका पीक लावलेल्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत संजय सीताराम सोनवणे यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून या वर्षी शेतीसाठी महाराष्ट्र बैंकेचे सुमारे एक लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतातील दोन एकर मका वारा आणि पावसामुळे पडल्याने नुकसान झाले होते. तसेच नुकत्याच आलेल्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजून कपाशीवर आलेल्या रोगामुळे ते चिंताग्रस्त होते. असे त्यांच्या मुलाने सांगितले. मयताचे पश्चात आई पत्नी एक विवाहित मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत शुभम अहिर यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली असून पुढील तपास हे पोहेकॉ विलास महाजन हे करीत आहेत.