मुंबई ( प्रतिनिधी ) – नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर नाही अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली आहे.आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे.
रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल अशी आशा आहे मात्र, आता महावितरण कंपनीने हा नविन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.
दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होतो पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढले तर कृषीपंपाचा वापर करावा लागणार आहे.
सध्या वाढत्या ऊनामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे. आतापर्यंत 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे. कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे. शिवाय 8 तासही सुरळीत पुरवठा होत नसल्याने यंदा महाविरणच्या निर्णयामुळे रब्बीच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणजे झालं.