जळगाव (प्रतिनिधी) – असोदा-जळगाव महामार्ग रस्त्याचे काम सुरु असून याठिकाणी नामनिर्देशन फलक लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यामुळे लहान मोठे अपघात होत असून संबंधित सरकारी यंत्रणेने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
असोदा-जळगाव रस्त्याचे काम करोनामुळे बंद होते. आता मात्र या रस्त्याचे काम सुरु झालेले आहे. रस्त्याचे काम करतांना नागरिकांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, असे दिसून आले आहे. काम सुरु असतांना कोणत्याही प्रकारचा सूचना फलक येथे लावण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत वाहनाचे अपघाताचे प्रमाण खुप प्रमाणात सुरु आहे. असोदा, भादली, शेळगाव, सुजदे, भोलाणे व इतर गावातील लोकांना कामासाठी जाण्यायेण्याकरिता या मार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र रेल्वे गेट ते असोदा पर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येता-जाता रस्त्याच्या समस्येमुळे वाहन चालविताना अडचणी येतात. आता रस्ता बनत असल्याने दिलासा मिळत असला तरी याठिकाणी सावधानतेचा सूचना फलक लावले गेले पाहिजेत अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.