पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती चांगली आहे. तर एक वर्षीय बालकाला धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवरे येथील शेत शिवारात शेती काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथील शेतमजूर कामासाठी आले आहेत शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी त्यांनी प्यायल्याने त्यांना मळमळ लागले व काहींना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रथम उपचार करून पारोळा कॉटेज हॉस्पिटलला पाठवण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार केले असता आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या. घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेशहून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसापासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत.
तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कुटीर रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत. आमदार चिमणराव पाटील यांनीही रूग्णालयात रूग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.
उपचार घेत असलेल्या मजुरांची नावे
विक्रम दिवाण पावरा (वय १), लोहान दिवाण पावरा (वय ४), मिथुन सखाराम पावरा (वय ७), कैलास उतारा पावरा (वय १२), नाव्या कालसिंग पावरा (वय १०), हेमा दिवाण पावरा (वय २४), प्रमिला भीमसिंग पावरा (वय १२), गीता गोविंदा पावरा (वय १०), रेला गुजारा पावरा (वय १०), करीना गुजारा पावरा (वय २१), दीदी राकेश पावरा (वय १०), अंजना राकेश पावरा (वय ३), ईश्वर राकेश पावरा (वय २), रविता उंदरा पावरा (वय ६), सविता कालसिंग पावरा (वय ४), राधिका कालसिंग पावरा (वय २), फिरका कालसिंग पावरा (वय ३), अजय कालसिंग पावरा (वय १३), हिना सिताराम पावरा (वय ११), सविता रहीजा पावरा (वय १८), देब्या कालसिंग पावरा (वय ११), सुरेखा सिताराम पावरा (वय १०), पूजा सिताराम पावरा (वय १), नावीता राकेश पावरा (वय २२), रुचिका कालसिंग पावरा (वय २)