एरंडोल तालुक्यातील वनकुटे येथील उपक्रम
वावडदा ( वार्ताहर ) – आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनने आपले सामाजिक दायित्व जपत एरंडोल तालुक्यातील वनकुटे येथील सहवास प्रौढ मतिमंद मुलांच्या विना-अनुदानित निवासी पुनर्वसन संस्थेतील विशेष मुलांसोबत दिवाळीचा सण उत्साहाने साजरा केला. फौंडेशनच्या या उपक्रमामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.

या विशेष सोहळ्यामध्ये आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनच्या वतीने संस्थेतील सर्व विशेष मुलांना फराळ वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसांची गरज लक्षात घेऊन त्यांना बेडशीट आणि ब्लॅंकेट तसेच जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले. फौंडेशनचे संचालक जितेंद्र पाटील यांनी स्वतः पदाधिकारी यांच्यासह उपस्थित राहून संस्थेतील मुलांची मायेने विचारपूस केली. त्यांनी सहवास संस्थेचे पदाधिकारी ज्या काळजीने या विशेष लेकरांचा सांभाळ करत आहेत, त्याबद्दल संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
सहवास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे आभार मानले. “असे उपक्रम ग्रामीण भागातील संस्थांमध्ये संपन्न झाले तर खऱ्या अर्थाने या विशेष मुलांचे आयुष्य देखील सुसह्य होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या दिवाळी सोहळ्याला आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या मातोश्री सरोजबाई पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख आनंद श्रीराम सूर्यवंशी, आणि सामाजिक कार्यकर्ते विजु ठाकूर, दर्शना ठाकूर, संजय भदाणे, संजू पाटील (नागदूली), साई चौधरी, ओम चौधरी तसेच महिला सामाजिक कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.









