जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून यंदा वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक सुट्टीवर गेलेले आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मागील वर्षी कोरोना महामारीमुळे सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हत्या. आता मात्र कोरोनाच्या दोन्ही लाटा ओसरल्यानंतर व कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे यंदाच्या वर्षी सुट्ट्या जाहीर केल्या आहे. यामुळे प्राध्यापकांना घरी जाता येत आहे.
या सुट्ट्या प्रत्येकी १५ दिवसांच्या दोन टप्प्यात असून नोकरीत कायम असलेल्या प्राध्यापकांनाच लागू केल्या आहेत. सहाय्यक प्राध्यापक व पाठ्यनिर्देशिका यांना सुट्टी लागू नाही. जर कोरोना महामारीची तिसरी लाट आली तर सुट्ट्या रद्द होतील. २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर व ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान एका टप्प्यात प्राध्यापक सुट्ट्या घेत आहेत. जळगावच्या महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात औषधवैद्यक शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, पॅथॉलॉजी आदी विभागांचे सुमारे ६ ते ७ प्राध्यापक सुट्टीवर गेले आहेत.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागात एकच कायम प्राध्यापक आहेत. त्यामुळे सुटीवर गेल्यास त्यांना ट्यूटरकडे चार्ज द्यावा लागणार आहे. काही ३ ते ४ विभागात एकही कायम प्राध्यापक नाहीत. त्यामुळे तेथील तात्पुरत्या स्वरूपात असणारे प्राध्यापकांना हिवाळी सुट्टी लागू नाही. तसेच, महाविद्यालयातील तिन्ही वर्षातील विद्यार्थींना १ ते १० नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या जाहीर आहेत.