सूचना जारी, दर्शनी भागात फलक लावण्याच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या आरोग्य सेवा, तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्क निःशुल्क करण्याबाबत आरोग्य विभागाने शनिवारी १२ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे. हा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सरकारी रुग्णालयांना लागू राहणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार काहीसा थांबणार असल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्य विभागातील सर्व रुग्णालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून रुग्णांना मोफत उपचार मिळतील. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत.
मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. तसेच दि. ०३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकिय रुग्णालयामधून करण्यात येणा-या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील वैद्यकिय सेवा (राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वगळून) निःशुल्क करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार आकारण्यात येणारे रुग्णशुल्क दिनांक १५ ऑगस्ट २०२३ पासून आकारण्यात येऊ नये, असे परिपत्रकात आरोग्य सेवेचे आयुक्त धीरज कुमार यांनी म्हटले आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.आरोग्य संस्थेमध्ये येणा-या रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क नोंदणी करण्यात यावी. आरोग्य संस्थामध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या तपासण्या निःशुल्क करण्यात यावेत किंवा कोणत्याही प्रकारचे दर आकारण्यात येऊ नये. बाहयरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकिय अधिका-यांनी रुग्णांना बाहेरून औषधी व इतर कंझ्युमेबल्स खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये. क्वचित प्रसंगी बाहेरील औषधी रुग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करुन रुग्णांस मोफत उपलब्ध करुन द्यावे.
आरोग्य संस्थामध्ये होणा-या चाचण्या (उदा. इसीजी, एक्सरे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी) यांचे शुल्क आकारण्यात येऊ नये. आंतररुग्ण विभागामध्ये दाखल असलेल्या रुग्णांस डिचार्ज करतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावे याबाबतचा लेखाजोखा अद्ययावत करण्यात यावा. या योजनेची जनतेला माहिती व्हावी, या हेतूने सविस्तर माहिती व्यापक स्वरुपावर प्रसिध्दी माध्यमाव्दारे प्रसिध्द करण्यात यावी. आरोग्य संस्थेच्या आवारात याबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत.
आरोग्य संस्थेमध्ये रुगणसेवेबाबत शुल्क आकारल्याबाबतची तक्रार टोल फ्री १०४ क्रमांकच्या नंबर करता येईल, याबाबत सुस्पष्ट जनजागृती करण्यात यावी. प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल व त्याबाबत संबंधित संस्था प्रमुखाला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी/ जिल्हा शल्यचिकित्सक यांना अवगत केले जाईल. तक्रारीची निवारण करण्याची जबाबदारी ही संबधित संस्था प्रमुखाची राहील. आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचारी /अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक/ जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील.