मुंबई ( प्रतिनिधी ) – ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे अशी माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले असून आता लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना संसर्ग, ओमायक्रॉनचा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमायक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.