भुसावळ तालुक्यात जळगाव एलसीबीची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वरणगाव शहरातून विना परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत २ गावठी पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस असा एकूण५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आगामी सण-उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, वरणगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापूर शिवार, ऑर्डनेंस फॅक्टरी वरणगाव) हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत आहे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.
वरणगाव शहरातील तिरंगा चौकात दि. ८ रोजी रात्री ११.३० वा. संजय चंडेले येणार असल्याची खात्री झाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. पो.उ.निरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथक तिरंगा चौकात पोहोचले. तेथे झाडाजवळ उभ्या संशयित व्यक्तीला पकडण्यात आले. चौकशीत त्याने नाव संजय गोपाळ चंडेले (वय ५०) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करीत आहेत.
दरम्यान, आरोपी संजय चंडेले याच्यावर यापूर्वी देखील आर्म्स अॅक्टचे दोन गुन्हे नोंद आहेत. सदर कारवाई पो.उ.निरीक्षक शरद बागल, ग्रे.पो.उ.निरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ राहुल वानखेडे तसेच चापोकॉ भारत पाटील यांनी केली आहे.