जामनेर तालुक्यात खडकी रस्त्यावर झाला होता अपघात, मुंदखेडा येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथून खडकीदरम्यान रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत ३३ वर्षीय तरुण हा दि. १२ जुलै रोजी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर २० दिवसांपासून खाजगी व नंतर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवदास सोनु पवार (वय ३३, रा. मुंदखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मुंदखेडा गावात पत्नी, २ मुले, २ मुली यांच्यासह राहत होते. गावात शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)शिवदास पवार हे दि. १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुंदखेड्याहून सोनारी गावी जात असताना खडकी गावाजवळ महादेव मंदिराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात शिवदास पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटुंबीयांनी जळगावात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गेल्या आठ दिवसांपासून खाजगी रुग्णालयातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आहे. दरम्यान, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे मुंदखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.