जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील ३० वर्षीय गृहिणी दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी २० रोजी सायंकाळी साडेसातला नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शिल्पा उमाकांत खाचणे (वय ३०, रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) असे मृत गृहिणीचे नाव आहे. शिल्पा खाचणे पती उमाकांत मोतीराम खाचणे यांच्यासह वास्तव्याला होत्या. जळगाव एमआयडीसीतील कंपनीत दोघे पती-पत्नी काम करून उदरनिर्वाह करत. शिल्पा यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दोघे जण नशिराबाद गावातील मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी आले होते. मोबाईलचे काम आटोपून दोघेही पुन्हा बेलव्हाय जाण्यासाठी दुचाकीने निघाले. सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या रिकाम्या जागेत दुचाकीचे पुढील चाक येऊन चालक उमाकांत यांचा वाहनावरील ताबा सुटून शिल्पा खाचणे या जमिनीवर पडल्या.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पती उमाकांत खाचणे आणि दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.